मधुमेहींना मराठीतून सोप्या भाषेत मधुमेहाविषयी माहिती देणारे त्रैमासिक संस्थेतर्फे सुरु करण्याचा महत्वाचा उपक्रम १५ ऑगस्ट १९८७ रोजी सुरु झाला. या त्रैमासिकाचे पहिले नाव 'मधुस्नेह' असे होते. संपादक डॉ. रमेश गोडबोले व संपादन सहाय्यक म्हणून डॉ. रमेश दामले, अॅडव्होकेट बी. एन. श्रोत्री, डॉ. मदन फडणीस, श्री. र. पां. देशपांडे व सौ. नीता आंबेकर (कुलकर्णी ) यांची नियुक्ती केली होती. अंकाची सजावट श्री. शाम देशपांडे व श्री. च. ह.पाटील यांनी केली. शुभारंभाच्या अंकाचे अनावरण मुंबईचे प्रसिध्द मधुमेह तज्ञ व डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. श्री. झां आजगावकर यांचे हस्ते मोठया दिमाखात करण्यात आले. समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक श्री. जयंतराव टिळक यांनी भूषविले होते. सरकारी नोंदणी नियमानुसार भारतात एका नावाच्या दोन मासिकांना परवानगी मिळू शकत नसल्यामुळे त्रैमासिकाचे नामांतर "मधुमित्र " असे १५ फेब्रुवारी १९८८ पासून करण्यात आले.
संपादन सहाय्यक म्हणून कार्य करणारे पुण्यातील प्रसिध्द अॅडव्होकेट श्री. बी. एन. श्रोत्री यांचे मासिकाचे पहिले वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच एकाएकी निधन झाले. त्यांचे जागी सौ. मंदाकिनी अवचट कामात मदत करू लागल्या.
|